
दोन दिवसांपासून घरातच; चिपळूणमध्ये ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
बेंदरकर आळीतील घटना; शेजाऱ्यांनी दरवाजातून पाहिल्यानंतर प्रकार आला उघडकीस
चिपळूण : शहरातील बेंदरकर आळी येथील औदुंबर सोसायटीमध्ये ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) दुपारी उघडकीस आली. फुरकान इक्बाल अली कापडी असे मृत तरुणाचे नाव असून, ते गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर पडले नसल्याने हा प्रकार समोर आला.
औदुंबर सोसायटीच्या बी विंगमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोली क्रमांक २०३ मध्ये फुरकान राहत होते. दोन दिवसांपासून त्यांची हालचाल दिसत नसल्याने शेजारी राहणारे आनंद रामकृष्ण बंदरकर यांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवून आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजावरील छिद्रातून आत पाहिले. त्यावेळी फुरकान हॉलमध्ये अंथरुणावर निश्चल अवस्थेत पडलेले दिसून आले.
त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ६५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे पुढील कार्यवाही सुरू आहे.




