कडवई बाजारपेठ कॉजवेच्या कामाचे उद्घाटन; रस्त्याचेही भूमिपूजन

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कॉजवे (पूल) कामाचे उद्घाटन आणि रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न सुकर होण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना आमदार निकम यांनी स्थानिक विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देणे आणि उपलब्ध निधीतून आवश्यक सुविधा निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉजवे आणि रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कडवई येथे स्मशानशेड उभारण्यासाठी कै. नसीर जुवळे व त्यांच्या परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत तीन गुंठे जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले. या जागेवर स्मशानशेड उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार शेखर निकम यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आपल्या माध्यमातून निधी उपलब्ध करून स्मशानशेड उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला राजेंद्र सुव्रे, राजन कापडी, सादिक काझी, श्रीपत गावकर, मोडक भाभी, डॉ. ताठरे, सिकंदर जुवळे, दत्ता ओकटे, इक्बाल मोडक, भैया प्रसादे, बापू कदम, राहिल कडवईकर, सुरेश सागवेकर, ठेकेदार मयूर भिगार्डे, विलासकाका पुरोहित, बापू चव्हाण, दिलनवाझ खोत, नजीरा खान यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉजवे, रस्ता आणि स्मशानशेडसारख्या मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि जुवळे परिवाराने दिलेल्या जागेच्या योगदानामुळे कडवईच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button