
अंजणारी पुलावर ट्रकच्या धडकेत लक्झरी बस उलटली; ३० प्रवासी जखमी
: मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका खासगी लक्झरी बसला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३० प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ८ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने लक्झरी बसला मागून धडक दिली. पहिल्या धडकेनंतर काही क्षणातच या ट्रकची बसला दुसऱ्यांदा जोरदार धडक बसली, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्यावरच उलटली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, उलटलेला बस महामार्गावर तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत गेली. पहाटेच्या शांततेत झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा आणि लांजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
या अपघातातील सर्व ३० जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, पाली आणि लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या ८ प्रवाशांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम हाती घेतले असून, सध्या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




