
महावितरणकडून ग्राहकांना दरवाढीचा पुन्हा ’शॉक, इंधन समायोजन शुल्क लागू
उन्हाळ्यातील वाढीव वीजबिलानंतर पावसाळ्यात वीज वापर कमी झाल्याने दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या वीजग्राहकांना आता पुन्हा झटका बसण्याची शक्यता आहे जुलै महिन्यातील वीज वापरासाठी महावितरणकडून इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आले असून, त्यामुळे ऑगस्टमध्ये येणार्या वीजबिलात अतिरिक्त रक्कम आकारली जाणार आहे. घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक, औद्योगिक आणि इलेक्ट्रिक वाहनधारकांनाही या शुल्काचा फटका बसणार आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला काही प्रमाणात महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली. या अतिरिक्त वीजखरेदीचा खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार इंधन समायोजन शुल्क आकारण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
घरगुती ग्राहकांच्या वीज वापराच्या श्रेणीनुसार हे शुल्क वेगवेगळे असणार आहे. दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना प्रति युनिट १० पैसे, १००० युनिटपर्यंतच्या वापरासाठी २० पैसे, २०१ ते ३०० युनिटसाठी ४० पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ५० पैसे, तर ५०० युनिटपेक्षा अधिक बीज वापरणार्या ग्राहकांना प्रति युनिट ६० पैसे अतिरिक्त आकारले जात आहे.




