
पोहे ६५, तेल १८५, साखर ५५..! फराळ महागला, खिसा रिकामा; दिवाळी साजरी करायची कशी ?
पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महागाईच्या झळांनी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडवले आहे. अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल, साखर, बेसन, पोहे आणि फराळासाठी लागणाऱ्या अन्य साहित्याच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.
काही जीवनावश्यक वस्तूंचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने दिवाळीचा सण साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. फराळाचे साहित्य, नवीन कपडे, घराची सजावट आणि भेटवस्तूंच्या खरेदीसाठी वाढीव खर्च करावा लागत असल्याने सर्वसामान्यांचे दिवाळीचे बजेट कोलमडले आहे.
दसरा-दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह असतो. घराघरांत फराळाची तयारी सुरू होते, मुलांसाठी नवीन कपडे घेतले जातात आणि नातेवाइकांना भेटवस्तू देण्याची लगबग सुरू होते. मात्र, यंदा महागाईमुळे या आनंदावर मर्यादा येत आहेत. मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरखर्च भागवतानाच सामान्य नागरिकांची दमछाक होत आहे. त्यातच दिवाळीसाठी होणारा अतिरिक्त खर्च पेलणे कठीण झाले आहे.
दुष्काळाचे सावट; दरवाढीची चिंता दुष्काळजन्य परिस्थिती, विविध डाळींचे घटलेले उत्पादन आणि बाजारातील आवकेवर होणारा परिणाम यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खाद्यतेल, हरभरा डाळ, गूळ, साखर, बेसन, मैदा, रवा आणि पोह्यांच्या दरात वाढ झाल्याने रोजच्या स्वयंपाकापासून दिवाळीच्या फराळापर्यंत सर्वच बाबींवर त्याचा परिणाम झाला आहे. उत्पादन आणि आवक कमी राहिल्यास आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यताही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
फराळाचे प्रमाण घटवण्याची वेळ दिवाळीच्या फराळात चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे यांसारख्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. मात्र, खाद्यतेल, बेसन, डाळी, साखर आणि सुका मेवा महागल्याने फराळ बनवण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे यंदा घरगुती फराळाचे प्रमाण कमी करण्याकडे गृहिणींचा कल आहे. वेळेअभावी तयार फराळ खरेदी करणाऱ्या नोकरदार महिलांनाही वाढीव दरांचा फटका बसत आहे. एकीकडे परंपरा जपण्याची इच्छा, तर दुसरीकडे वाढता खर्च, अशा कात्रीत सामान्य कुटुंबे सापडली आहेत.
डाळींच्या दरवाढीचा बेसनालाही फटका “दिवाळीच्या काळात महागाईत आणखी भर पडत आहे. विविध प्रकारच्या डाळींची आवक घटत असून उत्पादनही अत्यल्प आहे. त्यामुळे येत्या काळात आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, दरवाढ सुरूच राहू शकते. दिवाळीच्या फराळासाठी चणाडाळ आणि बेसनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. डाळींचे दर वाढल्याने बेसनही महाग झाले आहे.” – नितीन नहार, डाळींचे व्यापारी, मार्केट यार्ड
महागाईमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले “सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे वस्तूंच्या उपलब्धतेवर परिणाम होत असून दरवाढीवर नियंत्रण ठेवणे कठीण बनले आहे.” – सूर्यकांत पाठक, ग्राहक पेठ
खरेदीचा उत्साह कायम; मात्र ग्राहकांचा हात आखडता “सणासुदीच्या काळात बाजारपेठेत चैतन्य असते. यंदा जीवनावश्यक वस्तूंचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने सामान्य ग्राहक खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. तरीही बाजारपेठेत दिवाळी खरेदीचा उत्साह दिसत आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त पूना मर्चंट्स चेंबरतर्फे फराळाचे साहित्य स्वस्त दरात उपलब्ध करून दिले जाते. त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होतो.” – राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
‘फराळ कसा बनवायचा?’ गृहिणींची चिंता “पूर्वी दिवाळी म्हटली की घरात फराळाचा सुवास दरवळायचा. नवीन कपड्यांच्या खरेदीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. मात्र, यंदा महागाईने आमचे गणितच कोलमडले आहे. तेल, डाळी आणि साखरेचे दर वाढल्याने दिवाळीचा फराळ कसा बनवायचा, हा मोठा प्रश्न आहे. खर्च आवाक्यात ठेवण्यासाठी फराळाचे प्रमाण कमी करण्याचा विचार करावा लागत आहे.” – सारिका अष्टूळ, गृहिणी
असे आहेत जीवनावश्यक वस्तूचे दर :
प्रकार : मागील सप्टेंबर २०२६ महिन्यातील घाऊक दर : आताचे घाऊक दर ऑक्टोबर २०२६
साखर ३९ ते ४३ : ५४ ते ५५
गूळ ४५ ६५ : ६० ते ७५
हरभरा डाळ ७० ते ७५ : ९०ते १००
खाद्यतेल १६० : १८५
खोबरे ३८० : ४००
रवा ४३ : ४५ ते ४८
मैदा ४५ : ४८
बेसन ९० : १२० ते १२५
पोहे पातळ व जाड ४५ ते ५० : ६० ते ६५ ———-




