१९ वर्षीय तरुणीच्या पोटातील टोकदार पिन एंडोस्कोपीने काढली; मोठी शस्त्रक्रिया टळली


डेरवणच्या वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांना यश; अल्प खर्चात मिळाले उपचार


खेळताना चुकून पोटात गेलेली टोकदार पिन एंडोस्कोपीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. महाड तालुक्यातील १९ वर्षीय तरुणीवर ही उपचारप्रक्रिया करण्यात आली. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. आनंद जोशी यांनी कौशल्याने पिन बाहेर काढल्याने तरुणीवरील मोठ्या शस्त्रक्रियेची गरज टळली. तसेच अल्प खर्चात उपचार उपलब्ध झाल्याने तिच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला.

महाड तालुक्यातील एका गावात राहणारी ही तरुणी खेळत असताना तिने टोकदार पिन तोंडात धरली होती. त्याचवेळी अचानक पिन घशातून खाली जाऊन पोटात पोहोचली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तातडीने आपल्या पालकांना माहिती दिली. पालकांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे करण्यात आलेल्या एक्स-रे तपासणीत पिन जठरात अडकल्याचे स्पष्ट झाले.

पुढील उपचारांसाठी तरुणीला मुंबई किंवा पुणे येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, तेथील उपचारांचा खर्च परवडणारा नसल्याने पालकांनी डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाशी संपर्क साधला.

रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉ. आनंद जोशी यांनी एंडोस्कोपीद्वारे पिन काढण्याचा निर्णय घेतला. आवश्यक ती खबरदारी घेत ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता पिन बाहेर काढण्यात आल्याने तरुणीला दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, रुग्णालयात ही उपचारप्रक्रिया अल्प खर्चात करण्यात आली.

टोकदार वस्तू गिळल्यास तातडीने उपचार घ्या

अन्ननलिका किंवा पोटात पिन, टाचणी अथवा अन्य टोकदार वस्तू अडकल्यास अंतर्गत अवयवांना इजा होण्याबरोबरच रक्तस्रावासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे अशा घटना घडल्यास वेळ न घालवता रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. या प्रकरणात वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्याने तरुणीवरील मोठी शस्त्रक्रिया टाळता आली. डॉ. आनंद जोशी आणि वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांमुळे तरुणीच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button