
मुंबई-ठाण्यात उकाडा कायम, कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना यलो अलर्ट!
महाराष्ट्रात सध्या विचित्र हवामान होत आहे. कधी मध्येच अति उष्णता तर कधी थोडं गारवा जाणवत आहे. एकीकडे मुंबई आणि ठाण्यात उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 17 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई-ठाण्यात उकाडा, कोकणात पावसाची शक्यता
मुंबई आणि ठाणे परिसरात शुक्रवारी तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवला. 17 ऑक्टोबर रोजीही या भागांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातही पावसाचा विशेष अंदाज नाही. त्यामुळे मुंबई महानगर परिसरातील नागरिकांना सध्या पावसापेक्षा उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
मात्र, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या भागांत वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामानाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत यलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पुणे जिल्हा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटमाथा परिसरात पावसाचा जोर काही ठिकाणी वाढू शकतो. या भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि घाटमार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.
विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेचा तडाखा कायम
राज्यातील सर्वच भागांत पावसाचे वातावरण नसून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनचा परतीचा प्रवास आणि वातावरणातील बदलांमुळे राज्यात एकाच वेळी कोरडे हवामान आणि पावसाची स्थिती पाहायला मिळत आहे. हवामानात बदल घडवणाऱ्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
18 ऑक्टोबरला काय स्थिती असेल?
18 ऑक्टोबर रोजी राज्याच्या काही भागांत पावसाचा अंदाज कायम राहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. सकाळी आणि रात्री उशिरा काही भागांत उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी आणि रात्री उशिरा उकाड्यापासून सुटका होणार आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ताशी 30 ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे.




