
गुहागर तालुक्यात अजून ७०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे : सभापती प्रणव पोळेकर

गुहागर : “एल निनोचा प्रभाव हा अख्या राज्यभर पाहायला मिळत असून, त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे. गुहागर तालुका ही अपवाद नाही. या परिणामांना कुठेतरी ब्रेक लागण्यासाठी, पाणी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जिरवून ठेवण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण राज्यात बंधारे बांधण्याचे आवाहन करत हे मिशन बंधारे राबवण्याचा निर्णय घेतला. या आवाहनाला गुहागरच्या पंचायत समितीने चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या घडीला गुहागर तालुक्यात साधारणतः ५०० बंधारे बांधले असून, अजून ८०० बंधारे बांधण्याचे टार्गेटउद्दिष्ट पूर्ण करायचे आहे,” असा विश्वास गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी व्यक्त केला.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वाकी नदीवर लोकसहभागातून निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या माध्यमातून जेसीबीच्या सहाय्याने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना सभापती प्रणव पोळेकर पुढे म्हणाले की, पंचायत समितीची आढावा बैठक आम्ही ८ ऑक्टोबरला घेतली. यावेळी वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कशाप्रकारे बंधाऱ्यांचे नियोजन करता येईल, याचा आम्ही एक आराखडा तयार केला होता. त्याच्याच माध्यमातून आबलोली येथे आज बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्रोत कमी होताना पाहायला मिळत आहेत. साधारण १.४१ मीटरने पाणी पातळी कमी झाली असून, ती कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. ते काम चालू केले आणि मिशन बंधारा ही मोहीम गुहागर तालुक्यामध्ये जोरदार सुरू झाली आणि त्यातूनच आतापर्यंत ५०० बंधारे बांधले आहेत. अजूनही ७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, हे उद्दिष्ट येत्या काही दिवसात पूर्ण करू. आज मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांची शृंखला तयार झाली.
या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याबद्दल येथील सरपंच आणि ग्रामस्थांचे आभार त्यांनी यावेळी मानले.
यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. रूपाली कदम, श्रीमती नम्रता निमूणकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन कारेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालशेतकर, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, योगेश पालशेतकर, योगेश भोसले, समीर शिंदे, रेणुका पवार, प्रथमेश निमूणकर, प्रशांत नेटके, उदय सुर्वे आदी उपस्थित होते.




