
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील “क्यूआरटी”च्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) मधील जवानांची कार्यक्षमता वाढविणे, सागरी परिस्थितीत आपत्कालीन प्रसंगांना प्रभावीपणे सामोरे जाणे तसेच किनारपट्टी भागातील हालचालींबाबत आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने २ महा. नेव्हल युनिट (एनसीसी), रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या The Most Enterprising Naval Unit (MENU-27) Camp अंतर्गत “क्यूआरटी”च्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.
७ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत भाट्ये समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील १८ जवानांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणादरम्यान जवानांना बोट सेलिंगचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
सागरी किनारपट्टी लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती, सागरी सुरक्षा आणि विशेष मोहिमांच्या अनुषंगाने पोलीस जवानांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. अशा प्रशिक्षणामुळे जवानांची किनारपट्टी भागातील कार्यक्षमता वाढण्यास तसेच गरजेनुसार बचावकार्य आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.
या शिबिरासाठी २ महा. नेव्हल युनिट (एनसीसी), रत्नागिरीचे डेप्युटी कॅम्प कमांडंट विशाल भोसले यांच्यासह रत्नागिरी पोलीस दलातील प्रभारी अधिकारी सुरक्षा शाखा रत्नागिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप यादव तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.




