महामार्गाच्या दुरावस्थेवरून भाजप आक्रमक; महामार्ग कार्यालयावर धडक

खड्डे बुजविण्याची मागणी; उद्यापर्यंत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चिपळूण : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, यावरून चिपळूण शहर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह महामार्गावरील पुलाखालील साफसफाई तातडीने करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.

यावेळी नगरसेविका अंजली कदम आणि नगरसेवक शशिकांत मोदी यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेकदा निदर्शनास आणूनही खड्डे बुजविण्याचे काम होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

नगरसेविका अंजली कदम यांनी कार्यकारी अभियंत्यांशी फोनवरून चर्चा केली. खड्डे बुजविण्याचे काम उद्यापर्यंत सुरू झाले नाही, तर महामार्ग विभागाच्या कार्यालयात येऊन आंदोलन करून घेराव घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी भाजपचे नगरसेवक शुभम पिसे, कार्यकर्ते रुई खेडेकर, स्वाती देवळेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button