
टपाल विभागातर्फे फिलाटेलीसाठी ‘दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना’ जाहीर; १० सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत
रत्नागिरी, दि, २० ) – शालेय विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे गोळा करण्याच्या (फिलाटेली) छंदाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे ‘दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२६ असून, पात्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण विभाग डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.
योजनेचे प्रमुख मुद्दे व पात्रता:
- पात्रता व शिष्यवृत्ती रक्कम: ही योजना इयत्ता ६ वी ते ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये याप्रमाणे वार्षिक ६,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.
- शैक्षणिक निकष: विद्यार्थ्याला मागील वार्षिक परीक्षेत किमान ६०% गुण (SC/ST प्रवर्गासाठी ५५% गुण) असणे बंधनकारक आहे.
- फिलाटेली क्लब सदस्यत्व: विद्यार्थ्याच्या शाळेत फिलाटेली क्लब असावा व तो त्याचा सदस्य असावा किंवा विद्यार्थ्याचे स्वतःचे स्वतंत्र फिलाटेली खाते असावे.
- निवड प्रक्रिया:
- पहिला टप्पा: ३० सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी येथे विभागीय स्तरावर ५० गुणांची बहुपर्यायी (MCQ) लेखी परीक्षा होईल. यामध्ये कोणतेही नकारात्मक गुण (Negative Marking) नसतील.
- दुसरा टप्पा: लेखी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्कल ऑफिसने दिलेल्या विषयावर फिलाटेली प्रकल्प सादर करावा लागेल. अंतिम निवड केवळ प्रकल्पाच्या मूल्यांकनावर आधारित असेल.
- बँक खाते: निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पालकांसोबत पोस्ट ऑफिस बचत बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत संयुक्त खाते उघडावे लागेल.
इच्छुक शाळा आणि विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज १० सप्टेंबर २०२६ पर्यंत जवळच्या टपाल कार्यालयात जमा करावेत.




