
कशेडी घाटात एकेरी वाहतूक सुरू; प्रवाशांना दिलासा
खेड : कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने तातडीने यंत्रणा घटनास्थळी पाठवून दरड हटविण्याचे काम हाती घेतले. यानंतर रस्ता अंशतः वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून सध्या घाटात एकेरी वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे.दरड हटविण्याचे काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे रस्ता मोकळा करण्यात आल्याने आता वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.प्रशासनाकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात येत असून पोलिसांच्या नियंत्रणाखाली एकेरी वाहतूक सुरू आहे. दरड हटविण्याचे उर्वरित काम सुरू असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक घाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





