भिवबंदर अणुऊर्जा आणि चिखलगांव बॉक्साईट प्रकल्प विरोधात ग्रामस्थांची धडक


दापोलीः- दापोली तालुक्यातील प्रस्तावित भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पासह चिखलगाव येथील प्रस्ताविक बॉक्साईट प्रकल्पाला नागरिकांचा प्रखर विरोध करत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक दिली व तहसिलदार अर्चना बोंबे यांना निवेदन सादर केले.
भिवबंदर येथे प्रस्ताविक अणुऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्ती, शेती, बागायती, मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दापोली तालुक्याची ओळख निसर्गसंपन्न आणि पर्यटनदृष्टया महत्त्वाचा तालुका म्हणून आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम करणारे प्रकल्प लादू नयेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. दुसरीकडे चिखलगाव येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पालाही ग्रामस्थांचा विरोध आहे. चिखलगावातील महिला मोठया संख्येने दापोली तहसिल कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी प्रकल्पाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करत तहसिलदार अर्चना बोंबे यांच्याकडे निवेदन सादर केले. महिलांचा मोठया संख्येने सहभाग असल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. दापोली तालुक्यातील नागरिकांचा विकासाला विरोध नसून स्थानिकांच्या हक्कांचे, पर्यावरणाचे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करूनच विकास झाला पाहिजे, अशी भूमिका या निमित्ताने पुढे आली आहे. मोठे औद्योगिक किंवा ऊर्जा प्रकल्प उभारताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे, त्यांच्या हरकती जाणून घेणे आणि प्रकल्पाचे पर्यावरणीय व सामाजिक परिणाम स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्प आणि चिखलगाव बॉक्साईट प्रकल्प या दोन्ही मुद्यांवर नागरिकांची भूमिका दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. तहसिल कार्यालयात एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी आणि महिलांनी दाखवलेली एकजूट ही प्रशासनासाठीही महत्त्वाचा संदेश मानला जात आहे.
दोन्ही प्रकल्पांबाबत नागरिकांनी तहसिलदार अर्चना बोंबे यांच्याकडे निवेदन देऊन आपला विरोध नोंदवला आहे. त्यामुळे आता प्रशासन या निवेदनातील मागण्या आणि ग्रामस्थांच्या हरकतींबाबत काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रकल्पांबाबत निर्णय घेताना स्थानिक जनतेचा आवाज ऐकला जावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
फोटो डिपी 05-02 दापोली तहसिलदार अर्चना बोंबे यांना निवेदन देताना प्रकल्पग्रस्त गावातील ग्रामस्थ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button