सरकारी रुग्णालये, दवाखान्यांतील डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित करणार; आरोग्य विभागाची विशेष समिती!


मुंबई : सरकारी रुग्णालये, दवाखान्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करा, केंद्र शासन तसेच अन्य राज्यांमध्ये सुरू असलेल्या डायनॅमिक ॲश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन योजनेचा अभ्यास करून महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्यात यावी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना ‘मॅग्मो’ने केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास तसेच अन्य मागण्यांसाठी आरोग्य विभागाची विशेष समिती नेमण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, गट-अ (मॅग्मो) यांनी मांडलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली होती. या चर्चेच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर व्यवहार्य उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शासनाने समिती गठित केली आहे.

या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करण्याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासन आणि इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या डायनॅमिक ॲश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन योजनेचा अभ्यास करून महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्याबाबत शिफारशी करण्यात येणार आहेत. याशिवाय, गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कल्याण निधी योजना तयार करण्याच्या दृष्टीने तिची रचना, कार्यकक्षा, आर्थिक तरतूद, लाभांचे स्वरूप आणि अंमलबजावणीची पद्धत यांचा सविस्तर अभ्यास समिती करणार आहे.

या समितीचे अध्यक्ष म्हणून आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये मंत्रालयातील अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना गट-अ (मॅग्मो) यांचे प्रतिनिधी तसेच आरोग्य क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सेवाविषयक अडचणी, कामाचा ताण, करिअरमधील प्रगती आणि कल्याणाशी संबंधित प्रश्नांचा सकारात्मक विचार होणे आवश्यक असल्याचे मत आबिटकर यांनी मांडले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या सेवाविषयक प्रश्नांवर धोरणात्मक तोडगा काढण्याचा या समितीचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढण्यास आणि राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल, असे आबिटकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button