
वाशिष्ठी नदीचे पाण्याचा एक थेंबही मुंबईला नेऊ देणार नाही; शौकत मुकादम यांचा आक्रमक इशारा
चिपळूण-कराड रेल्वेचे भूमिपूजन होऊनही काम सुरू नाही, मग कोकणाच्या पाण्यावर डोळा का? मुकादम यांचा सवाल
चिपळूण : वाशिष्ठी नदीचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला माजी सभापती तथा पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. वाशिष्ठी नदीच्या पाण्याचा एक थेंबही उचलू देणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
वाशिष्ठी नदीच्या पाण्यावर परिसरातील अनेक जॅकवेल, विहिरी, बोअरवेल, गाणे-खडपोली औद्योगिक वसाहत, लोटे एमआयडीसी तसेच कोकणातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. नदीचे पाणी अडवण्यासाठी सुमारे २५ ते ३० बंधारे बांधण्यात आले असून, काही ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांचाही पाणीपुरवठा याच नदीवर अवलंबून आहे.
अशा परिस्थितीत कोलकेवाडी, दळवटणे, कळंबस्ते आणि वालोपे परिसरातून पाणी उचलल्यास भविष्यात कोकणातच मोठी पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्थानिकांची पाण्याची गरज लक्षात न घेता मुंबईला पाणी नेण्याचा निर्णय का घेतला जात आहे, असा सवाल मुकादम यांनी उपस्थित केला.
चिपळूण-कराड रेल्वेचे भूमिपूजन होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. कोकणाच्या विकासाचे प्रकल्प रखडलेले असताना आता कोकणातील पाणी मुंबईला नेण्याचा घाट कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, आमदार शेखर निकम यांनी या पाणी वळवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवणारी घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही शौकत मुकादम यांनी स्पष्ट केले.




