
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याचा आरोप; २९ वर्षीय तरुणावर पोक्सोचा गुन्हा
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी ओळख करून मैत्रीचे नाते निर्माण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याचा गंभीर प्रकार गुहागरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुहागर येथील २९ वर्षीय समीर कांबळे याच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, डिसेंबर २०२५ मध्ये अल्पवयीन मुलीची समीर कांबळे याच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. जानेवारी २०२६ मध्ये कांबळे याने मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिला गुहागर बाग समुद्रकिनारी फिरण्यासाठी नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रानवी येथील जंगलमय भागातही तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा गुहागर बाग समुद्रकिनारी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर, मुंबई येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये तिची प्रसूती झाली. तिने एका मुलाला जन्म दिला.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून समीर कांबळे याच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.




