
शबाना आजमी यांचे हिजाब आणि बुर्क्याबाबत स्पष्ट मत; धर्माच्या नावाखाली महिलांवर बंधने लादणाऱ्यांनाही सुनावले
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी आपल्या अभिनयासोबतच स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही ओळखल्या जातात. सामाजिक प्रश्न असोत किंवा महिलांच्या हक्कांचा विषय, त्या अनेकदा आपली भूमिका मोकळेपणाने मांडताना दिसतात.आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी हिजाब आणि बुर्का या विषयावर आपले मत मांडले आहे. विशेष म्हणजे, ‘मी बुर्का घालत नाही, पण कोणी मला बुर्का घालण्यापासून रोखले तर मी तीन बुर्के घालेन,’ असे ठाम विधान त्यांनी केले आहे.
नुकत्याच उषा काकडे यांच्यासोबत झालेल्या एका संवादादरम्यान शबाना आजमी यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी धार्मिक शिकवण, महिलांचे स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता या विषयांवर आपले विचार मांडले. तसेच धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींचा अर्थ लावणाऱ्या मध्यस्थांवरही त्यांनी टीका केलीशबाना आजमी यांनी सांगितले की, कुराणमध्ये महिलांनी विशिष्ट प्रकारचा बुर्का परिधान करावा, असे कुठेही स्पष्टपणे सांगितलेले नाही. कुराणमध्ये केवळ नजरेत हया म्हणजेच मर्यादा आणि सभ्यतेची भावना असावी, असे सांगितले आहे. ही गोष्ट केवळ महिलांसाठी नसून पुरुषांनाही लागू होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
यावेळी त्यांनी धर्माच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या मध्यस्थांवरही निशाणा साधला. काही लोक धार्मिक गोष्टींचा अर्थ आपल्या सोयीनुसार बदलून सांगतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. कुराणमध्ये महिलांनी पडदा करावा, असे सांगितले आहे, असा समजही अशाच प्रकारे पसरवला जातो, असे शबाना यांनी म्हटले.या संवादातील शबाना आजमी यांचे एक विधान विशेष चर्चेत आले आहे. त्या म्हणाल्या, ‘मी बुर्का घालत नाही. पण कोणी मला बुर्का घालू नकोस, असे सांगितले तर मी तीन बुर्के घालेन. मला असे सांगणारे तुम्ही कोण?’
पुढे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कट्टर विचारांना प्रोत्साहन देण्यावरही प्रश्न उपस्थित केला. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ एखाद्याच्या वैयक्तिक निवडीवर बंधने घालणे असा होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे




