जनी जनार्दन’ चरित्रग्रंथाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार


सात वर्षांच्या लेखन-संशोधनाच्या मेहनतीला मिळाली मानाची पावती; पुण्यात पुरस्कार प्रदान


पुणे, दि. २५ : लेखक धीरज वाटेकर यांच्या २०२३ मध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या ‘जनी जनार्दन’ या चरित्रग्रंथाला पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सात वर्षांच्या लेखन व संशोधनाच्या मेहनतीला मिळालेला हा सन्मान साहित्य क्षेत्रातील महत्त्वाची पावती मानली जात आहे.

पुण्यातील नवी पेठ येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे माजी कुलपती तथा ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ज्ञ आणि २००७ च्या हवामान बदल विषयक संशोधनासाठी विभागून नोबेल पुरस्काराचे मानकरी डॉ. राजेंद्र शेंडे, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

न्या. महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा. गो. भांडारकर यांसारख्या महान विभूतींनी स्थापन केलेल्या संस्थेकडून ‘जनी जनार्दन’ला मिळालेला हा सन्मान अत्यंत मोलाचा असल्याचे धीरज वाटेकर यांनी सांगितले.

‘जनी जनार्दन’ हा ७०८ पृष्ठांचा प्रेरणादायी चरित्रग्रंथ असून, भारत सरकारच्या हाफकिन संस्थेने शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय ऊर्फ तात्यासाहेब नातू यांच्या जीवनकार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा या ग्रंथातून वेध घेण्यात आला आहे. आगळ्यावेगळ्या क्षेत्राला जीवन समर्पित करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे सविस्तर चरित्र मराठी साहित्यविश्वात वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वाटेकर यांनी आपल्या लेखन प्रवासात साथ देणारे गुरुजन, वाचक, प्रकाशक, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांचे आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. विनयजी नातू, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे चिपळूण येथील विभाकर वाचसिद्ध सर, शालेय जीवनातील मार्गदर्शक अरुण माने सर, सुधाकर घोटगे, पुरुषोत्तम कुंटे (काका), आदित्य कुंटे आदी उपस्थित होते.

“आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या,” अशी भावना धीरज वाटेकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button