आनंद हुले यांच्या १९ महिन्यांच्या लढाईला यश

  • मालवण सीआरझेड अतिक्रमण प्रकरणात हरित लवादाचा जिल्हाधिकाऱ्यांना ६ महिन्यांचा अल्टिमेटम

मालवण : हे एकट्या माणसाच्या जिद्दीचं यश आहे. मालवणचे आनंद अतुल हुले यांनी सीआरझेड क्षेत्रातील अतिक्रमणाविरुद्ध सुरू केलेली एकाकी लढाई आता राष्ट्रीय हरित लवादापर्यंत पोहोचली आहे आणि लवादाने जिल्हाधिकाऱ्यांना थेट ६ महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

आनंद हुले यांनी १७ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. सीआरझेड नियमांचं उल्लंघन होतंय, किनारपट्टीवर अतिक्रमण होतंय, शासन निर्णय २३ मार्च २०११ नुसार कार्यवाही करा अशी त्यांची स्पष्ट मागणी होती. महिने गेले तरी ठोस कार्यवाही होत नव्हती म्हणून त्यांनी थेट राष्ट्रीय हरित लवाद पुणे खंडपीठात मूळ अर्ज क्र ८२ / २०२५ दाखल केला.

१७ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ञ सदस्य डॉ सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हुले स्वतः हजर होते. जिल्हाधिकाऱ्यांनी २० जुलै २०२६ रोजी जबाब दिला होता की कार्यवाही सुरू केली आहे पण कालमर्यादा दिली नव्हती.

यावर लवादाने स्पष्ट शब्दात सांगितलं आता आम्हीच कालमर्यादा ठरवतो. जिल्हाधिकाऱ्यांनी ६ महिन्यात कायद्यानुसार कार्यवाही करून निर्णय घ्यावा आणि अतिक्रमण आढळल्यास ते काढण्याबाबत लवादाला कळवावं.

आनंद हुले यांची ही लढाई फक्त एका तक्रारीपुरती नाही. किनारपट्टी वाचवण्यासाठी, मच्छिमारांच्या हक्कासाठी आणि कायद्याचं राज्य राहावं यासाठी त्यांनी प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला आहे. वकिलाशिवाय स्वतः लवादात उभं राहून त्यांनी आपली बाजू मांडली.

राजकोट मच्छिमार व्यावसायिक सहकारी संस्था यांनी पक्षकार होण्यासाठी केलेला अर्जही लवादाने मूळ अर्ज निकाली निघाल्यामुळे निकाली काढला.

आता पुढील ६ महिने महत्त्वाचे आहेत. आनंद हुले यांच्या लढाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांना आता उत्तर द्यावंच लागणार आहे. मालवणकरांच्या नजरा आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button