एसटी महामंडळाच्या ‘एनसीएमसी कार्ड’मध्ये रिचार्ज करताना प्रवाशांच्या खिशाला बसणारा अतिरिक्त आर्थिक भार आता कमी होणार


राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ‘एनसीएमसी कार्ड’मध्ये रिचार्ज करताना प्रवाशांच्या खिशाला बसणारा अतिरिक्त आर्थिक भार आता कमी होणार आहे.रिचार्जवर आकारले जाणारे १० ते १२ रुपयांचे एजंट कमिशन रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे किमान ५० रुपयांच्या पटीत करावे लागणारे रिचार्ज पाच रुपयांच्या पटीत करता येणार आहे.एनसीएमसी कार्ड रिचार्जसाठी महामंडळाने ५ ते ६ हजार एजंट नियुक्त केले आहेत. त्यांना प्रत्येक व्यवहारामागे कमिशन देण्यात येत होते. त्यामुळे प्रवाशांनी रिचार्जसाठी भरलेल्या रकमेतून हे शुल्क वजा होऊन उर्वरित रक्कम कार्डमध्ये जमा होत होती. आता ही कमिशनची तरतूद बंद करण्यात आली आहे. यापुढे अधिकृत एजंट आणि एसटी वाहक यांच्याकडून टॉपअपसाठी एकसमान शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, व्यवहारावर ०.९० टक्के एमडीआर (मर्चंट डिस्काउंट रेट) आकारला जाणार असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणजे आता १०० रुपयांच्या टॉपअप वर फक्त ९० पैसे आणि १००० रुपयांच्या रिचार्जवर ९ रुपये इतकेच आकारले जाणार आहे.राज्य सरकारकडून मिळणाऱ्या प्रवास सवलती पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड सुरू केले आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी १६ फेब्रुवारी २०२६ पासून कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. २३ नोव्हेंबरपर्यंत एक कोटी ४७ लाख सवलतधारकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी एक कोटी २९ लाख कार्ड सक्रिय आहेत.

दरम्यान, किमान ५० रुपयांच्या पटीतच रिचार्ज करण्याची अट असल्याने प्रवाशांची अडचण होत होती. त्यामुळे रिचार्जची मर्यादा कमी करण्याची मागणी करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button