
रायगडच्या टकमक टोकावरून खेडच्या तरुणाची आत्महत्या, आत्महत्येचे कारण अज्ञात
दुर्गराज रायगडावरील प्रसिद्ध टकमक टोकावरून ३७ वर्षाच्या तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. शनिवारी पहाटे गेलेल्या तरुणाचा शोध सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृतदेह खोल दरीमध्ये आढळून आला. मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रहिवासी असलेला सुयोग सुरेश पांचाळ (३७) तरुणाचे नाव असून तो ठाण्यातील वागळे इस्टेट येथे वास्तव्यास होता.
याबाबत दुर्गराज रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड, हिरकणी वाडी, रायगड वाडी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून सुयोग याने शनिवारी सकाळी किल्ले रायगडच्या पायथ्याशी चित्ता दरवाजा नजीक आपली गाडी लावली आणि पायरी मार्गाने किल्ल्यावर निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.




