निशा आंबेकरांचा मानाचा तुरा‘बर्गमन ट्रायथलॉन १०२’ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण; रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पहिल्या महिला ठरण्याचा मान


जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर चिपळूण सायकलिंग क्लबच्या उपाध्यक्षा निशा गजानन आंबेकर यांनी ‘बर्गमन ट्रायथलॉन १०२’ ही अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. ४ ऑक्टोबर रोजी ओझर, पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत अशी कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला.

या स्पर्धेत २ किलोमीटर पोहणे, ८० किलोमीटर सायकलिंग आणि २० किलोमीटर धावणे अशा तीन क्रीडा प्रकारांचा समावेश होता. एकूण १०२ किलोमीटरचे हे आव्हान निर्धारित ८ ते ८.३० तासांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक होते. शारीरिक क्षमता, सहनशक्ती आणि मानसिक कणखरतेचा कस पाहणारे हे आव्हान निशा आंबेकर यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.

निशा आंबेकर यांना शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच क्रीडा क्षेत्राची आवड आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. शिक्षण आणि व्यवसाय सांभाळतानाही त्यांनी क्रीडा क्षेत्रातील सहभाग कायम ठेवला.

त्यांनी वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण (एम.कॉम.), एमबीए (फायनान्स), जीडीसी अँड ए तसेच योगशास्त्रातील एम.ए. ही शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे. व्यवसाय सांभाळत असतानाही सायकलिंग, धावणे आणि पोहणे या तिन्ही क्रीडा प्रकारांचा सातत्याने सराव करत त्यांनी ट्रायथलॉनसारख्या आव्हानात्मक स्पर्धेकडे वाटचाल केली.

बर्गमन ट्रायथलॉन १०२ पूर्ण करण्याच्या त्यांच्या कामगिरीमुळे चिपळूणसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात त्यांच्या नावाची विशेष नोंद झाली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे महिलांसाठीही क्रीडा क्षेत्रात नवे प्रेरणास्थान निर्माण झाले आहे.
…………………..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button