
गणपतीपुळे समुद्र दुर्घटना : बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू; एक मृतदेह सापडला, पोलीस अधीक्षक घटनास्थळी
गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून पर्यटनासाठी आलेल्या युवकांच्या गटातील पाच जण समुद्रात बेपत्ता झाले असून आत्ताच त्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे उर्वरितांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि जीवरक्षकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बिडकीन येथून १९ जणांचा युवकांचा गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सकाळी समुद्रकिनारी फिरत असताना काही युवक पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील तीव्र प्रवाह आणि उंच लाटांचा अंदाज न आल्याने पाच युवक खोल पाण्याकडे वाहून गेल्याची घटना घडली. काही क्षणांतच ते नजरेआड झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, जीवरक्षक आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत असले तरी बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे.
समुद्रात बेपत्ता झालेल्यांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा समावेश आहे. हे सर्व युवक बिडकीन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी आहेत.
घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शोध व बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. सध्या पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि जीवरक्षक घटनास्थळी तैनात असून बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून समुद्रकिनारी फिरताना आणि पाण्यात उतरताना पर्यटकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




