राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव!

Video : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर मोठी आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला आहे. या निकालांमुळे राज्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ३७ जिल्ह्यांतील ७,५४३ पंचायत समिती जागांपैकी ७,३९३ जागांचे आणि १,२७५ जिल्हा परिषद जागांपैकी ९८१ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पंचायत समितीच्या ३,७०१ जागांवर काँग्रेसने, तर २,१८१ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेतही काँग्रेसने ५९९ जागा जिंकल्या असून भाजपला ३०१ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जनतेचा सरकारच्या धोरणांविरोधात रोष: काँग्रेसची प्रतिक्रिया

या विजयानंतर राजस्थान काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून सत्ताधारी भाजपा सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यातील पंचायती राज निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजपाच्या कारभारातील भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून जनतेमध्ये असलेला असंतोष या निकालांतून दिसून आला आहे. हा विजयाचा प्रवाह आता वादळात रूपांतरित होऊन जनविरोधी सरकारला सत्तेतून खाली खेचेल,’ अशी प्रतिक्रिया राजस्थान काँग्रेसने व्यक्त केली आहे.

प्रमुख जिल्ह्यांतील चित्र काय?

राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने भाजपावर मोठी आघाडी घेतली आहे. जयपूरमध्ये काँग्रेसने २१६ पंचायत समिती जागा जिंकल्या, तर भाजपाला केवळ ८७ जागा मिळाल्या. जोधपूरमध्ये काँग्रेसला १९५ आणि भाजपला ८१ जागांवर यश मिळाले. याशिवाय भीलवाडा (काँग्रेस १६५, भाजपा १११), बिकानेर (काँग्रेस १५५, भाजपा ६५), दौसा (काँग्रेस १३५, भाजपा ५९) आणि सीकर (काँग्रेस १७९, भाजपा ८७) येथेही काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. पश्चिम राजस्थानमधील बाडमेर (१२० विरुद्ध ६२), जैसलमेर (८९ विरुद्ध ३६) आणि राजसमंद (९७ विरुद्ध ५८) येथेही काँग्रेसने भाजपला मागे टाकले.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ३७ पैकी २४ जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ भाजपापेक्षा अधिक राहिले आहे. दुसरीकडे, भाजपाने अजमेर, ब्यावर, डूंगरपूर, झालावाड, पाली आणि उदयपूर या ६ जिल्ह्यांत आघाडी घेतली आहे. पंचायत समितीमध्ये अजमेर (८३ विरुद्ध ८०), बालोतरा (६३ विरुद्ध ५७), सलूंबर (३८ विरुद्ध ३२) आणि उदयपूर (१४६ विरुद्ध १३७) येथे भाजपा काँग्रेसच्या पुढे राहिले.

दिग्गज नेत्यांच्या बालेकिल्ल्यांत काय घडलं?

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा जिल्हा असलेल्या भरतपूरमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने ४६ जागा जिंकल्या, तर भाजपाला ३२ जागा मिळाल्या; येथे अपक्षांनी सर्वाधिक ७६ जागांवर विजय मिळवला. गृहराज्यमंत्री जवाहर सिंह बेढम यांच्या डीग जिल्ह्यातही काँग्रेसने २५, भाजपाने १४, तर अपक्षांनी ४१ जागा जिंकल्या.

सीकर जिल्ह्यात नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री झाबर सिंह खर्रा यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या पत्नी शांती देवी (प्रभाग १७) आणि मुलगा अजय सिंह (प्रभाग २०) हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते, तर दुसरा मुलगा दुर्गा सिंह (प्रभाग १९) अपक्ष म्हणून रिंगणात होता; मात्र या तिघांचाही पराभव झाला.

याउलट, चुरू जिल्ह्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र राठोड यांच्या कुटुंबाने आपली ताकद कायम राखली. त्यांचे पुत्र पराक्रम सिंह राठोड यांनी प्रभाग ३९ मधून १७,८६१ मतांच्या मोठ्या फरकाने, तर स्नुषा कनिका सिंह यांनी प्रभाग २३ मधून २,३८४ मतांच्या फरकाने जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button