
समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी खेडमधील न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर!
खेड : समान काम, समान वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी खेड येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार खेड येथील जिल्हा न्यायालय क्रमांक १ व अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयांमधील सुमारे ६० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या वेतनश्रेणीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, तसेच समान कामासाठी समान वेतन मिळावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या मागण्यांकडे शासन व संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी न्यायालय परिसरात घोषणाबाजी केली.
‘कर्मचारी एकजुटीचा विजय असो’, ‘आमच्या न्याय्य मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणांनी न्यायालयाचा परिसर दणाणून गेला.
या बेमुदत संपात आर. बी. नितोरे, के. ए. पेंढारकर, एस. एस. चवेकर, सौ. मीनल चव्हाण, सौ. सरिता शिर्के, एस. एस. काद्री, सौ. एन. डी. पाष्टे, सी. एल. देवळेकर, एस. डी. जेधे, आर. जी. शिगवण, एस. के. मजगावकर, एस. एस. शिवलकर, एस. डी. माने, व्ही. के. शिद यांच्यासह सुमारे ६० न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले आहेत.




