
वसुंधरा राजेंचा बालेकिल्ला ढासळला! राजस्थान निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, काँग्रेसची जोरदार मुसंडी
राजस्थानमध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरू असल्याचे दिसत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा उलटफेर झाला असल्याचे दिसून येत आहे.भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या झालावाड नगर परिषदेत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसने भाजपचा हा मजबूत गड उद्ध्वस्त करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
झालावाड जिल्ह्यातील एकूण आठ स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी चार ठिकाणी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. झालावाड नगर परिषदेव्यतिरिक्त भवानी मंडी, खानपूर आणि डग येथे काँग्रेसने विजय मिळवला आहे. दुसरीकडे, भाजपला केवळ झालरापाटन, अकलेरा आणि मनोहरथाना या तीनच ठिकाणी सत्ता टिकवता आली आहे. तर पिडावा नगरपालिकेत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने ‘आम आदमी पार्टी’ (AAP) किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे.




