
ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते’; ‘मतचोरी’ वरून राहुल गांधींची टीका; रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचा एल्गार!
Video : देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने रविवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
“मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मदतीशिवाय नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊच शकले नसते,” असा थेट आरोप करत राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. या महामोर्चामध्ये काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील अनेक प्रमुख घटक पक्ष, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी नेते सहभागी झाले होते.
‘हा राजकीय पक्षाचा नाही, तर देशातील तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा आवाज’
रामलीला मैदानावरील सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापर्यंत जो संदेश पोहोचवायचा होता, तो या जनसागराने पोहोचवला आहे. हा केवळ एका राजकीय पक्षाचा आवाज नाही, तर देशातील तरुण, शेतकरी आणि सामान्य जनतेचा हुंकार आहे. या देशातील लोकशाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात येऊ देणार नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल, तुम्ही स्वतःला खूप मोठे समजत असाल; पण लक्षात ठेवा, तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही.”
विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संघटनांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच सणासुदीच्या काळात स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याकडून खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले.
‘ज्ञानेश कुमारांची हकालपट्टी हीच पहिली पायरी’
देशाची व्यवस्था रुळावर आणण्यासाठी सर्वात आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे गरजेचे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. “अमित शाह म्हणतात की नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत. पण मी सांगू इच्छितो की, जनता त्यांना सत्तेत राहू देणार नाही. ज्ञानेश कुमार यांच्यानंतर या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला.




