गावातील विकासकामांत अडथळे आणून खोट्या तक्रारी केल्याचा आरोप

कोंढेतड गाडगीळवाडीतील ग्रामस्थांची पोलिसांकडे धाव; संबंधितांची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी



राजापूर : कोंढेतड गाडगीळवाडी येथे गावातील विकासकामे, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच विविध घरगुती समारंभांमध्ये काही व्यक्तींकडून वारंवार वाद निर्माण केले जात असल्याचा आणि खोट्या तक्रारी दाखल करून गावातील शांतता व विकासकामांमध्ये अडथळे आणले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्जाद्वारे पोलिसांकडे केली आहे.
कोंढेतड गाडगीळवाडीतील स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत तसेच अन्य माध्यमांतून एकत्र येऊन विविध विकासात्मक निर्णय घेत असतात. मात्र, काही व्यक्तींकडून या कामांना विरोध करून वारंवार वादविवाद निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील विकासकामांवर परिणाम होण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि शांततेचे वातावरणही बिघडत असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारांमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. पाणीपुरवठ्याचे प्रश्न, रस्त्यांची कामे तसेच इतर सार्वजनिक विकासकामांमध्ये अडथळे निर्माण केले जात असून, त्यातून वारंवार पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या जात असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
तक्रार अर्जात काही व्यक्तींकडून महिलांच्या संदर्भाचा आधार घेऊन पुरुष मंडळींशी वाद घातले जात असल्याचा तसेच त्यांच्यावर विनयभंगासारखे गंभीर आरोप करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गावातील पुरुष मंडळींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या आरोपांची पोलिसांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ग्रामपंचायत, ग्रामसेवक, प्रशासक, तलाठी, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच अन्य शासकीय कार्यालयांशी संबंधित कामांमध्ये वारंवार तक्रारी करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक, आवश्यकतेनुसार उपलब्ध फोन रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सॲप संदेशांची कायदेशीर प्रक्रियेनुसार पडताळणी करावी. तसेच यापूर्वी दाखल झालेल्या तक्रारींची सत्यता तपासून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कोंढेतड गाडगीळवाडीतील ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button