
भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी अमित विलणकर यांचा पुढाकार!
काचेची बंदिस्त मेघडंबरी उभारण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेत सर्वानुमते मंजूर
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भंडारी भूषण, दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या संरक्षण आणि स्वच्छतेसाठी नगरसेवक अमित वसंत विलणकर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या पुतळ्यावर चारही बाजूंनी पारदर्शक काचेने बंदिस्त मेघडंबरी उभारण्यात यावी, असा प्रस्ताव त्यांनी रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला, ज्याला सभागृहात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
पुतळ्यावर नियमितपणे साचणारी धूळ आणि पक्ष्यांची विष्ठा यांमुळे होणारा विद्रूपपणा टाळणे हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश आहे. यासंदर्भात बोलताना नगरसेवक विलणकर यांनी ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या काचेच्या मेघडंबरीचा संदर्भ दिला. त्याच धर्तीवर रत्नागिरीतही भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याचे सौंदर्य व पावित्र्य जपले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल नगरसेवक अमित विलणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री मा. उदयजी सामंत, रत्नागिरीच्या मा. नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, नगरपरिषद प्रशासन आणि सर्व नगरसेवकांचे विशेष आभार मानले आहेत.




