अंजनारी पुलाजवळ भीषण अपघातात कर्तव्यावर असलेल्या एएसआय संतोष आप्पासाहेब गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू


लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रेलरची सरकारी बोलेरोला धडक; पोलीस कर्मचारी गंभीर, ट्रेलर चालकाचाही मृत्यू**


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) यांना प्राण गमवावे लागले. लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या भरधाव २२ टायरच्या ट्रेलरने सरकारी बोलेरो जीपला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पोलीस कॉन्स्टेबल अनिल अशोक शिंगाडे गंभीर जखमी झाले असून, ट्रेलर चालकाचाही मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री सुमारे ११.२० वाजता ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनारी घाटाखाली नदीपात्रात एक वाहन कोसळल्याची माहिती लांजा पोलिसांना मिळाली होती. या घटनेची दखल घेत हातखंबा येथील महामार्ग वाहतूक मदत केंद्रात कार्यरत असलेले एएसआय संतोष गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे हे सरकारी बोलेरो जीप (एमएच ०८ बीई ३५६१) घेऊन घटनास्थळी मदतीसाठी रवाना झाले होते.

अंजनारी पुलापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर असलेल्या तीव्र उताराच्या वळणावर त्यांची जीप आली असताना, मागून वेगाने आलेल्या लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रेलरने (आरजे ०९ जीई २३९७) बोलेरोला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, बोलेरो जीप रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सुमारे ८० ते १०० फूट खोल दरीत कोसळली. तर ट्रेलरही रस्त्यावरून घसरून उलटला.

या अपघातात बोलेरो जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला. वाहनाचे छप्पर, दरवाजे आणि आतील भाग पूर्णपणे चेपल्याने दोन्ही पोलीस कर्मचारी आत अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.

अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात खोल दरीत उतरून बचावकार्य सुरू करण्यात आले. या कार्यात स्थानिक ग्रामस्थांनीही सहकार्य केले. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही पोलिसांना जीपमधून बाहेर काढून प्रथम पाली ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच एएसआय संतोष गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

या अपघातात गंभीर जखमी झालेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे यांच्यावर रत्नागिरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार पुढील उपचारासाठी त्यांना आयसीयू सुविधेच्या रुग्णवाहिकेतून सांगली येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, बोलेरोला धडक दिल्यानंतर ट्रेलरही उलटल्याने त्याचा चालक केबिनखाली अडकला होता. या दुर्घटनेत त्याचाही मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रेलर महामार्गावरून हटविण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य आणि अन्य कार्यवाही पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लांजा पोलीस ठाण्यातील एएसआय भुजबळराव, राणे, नाईकवाडे, बाजागे, मारळकर, विलास जाधव यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी बचावकार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कर्तव्य बजावत असताना झालेल्या या भीषण अपघातात एएसआय संतोष गायकवाड यांचा झालेला मृत्यू पोलीस दलासाठी मोठी हानी ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button