
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र; फटाक्यांची दुकानेही हटवली
बहादूरशेख नाका ते शिवाजी चौकदरम्यान कारवाई; सलग तिसऱ्या दिवशी पालिकेचे धडक अभियान
चिपळूण, ता. ३१ : दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चिपळूण नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग दिला आहे. शुक्रवारी (ता. ३०) बहादूरशेख नाका ते शिवाजी चौकदरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्याबरोबरच बाजारपेठेतील फटाक्यांची दुकानेही हटविण्यात आली.
शहरातील बाजारपेठ ते बहादूरशेख नाका या मार्गावर अनेक विक्रेत्यांनी रस्त्यावर स्टॉल, छत्र्या आणि विविध वस्तू मांडून व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वारंवार कोंडी होत होती. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू राहिल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बाजारपेठेतील फटाक्यांची दुकाने तसेच आकाशकंदील, पणत्या आणि दिवाळी सजावटीच्या साहित्याचे स्टॉल पवन तलाव मैदानात एका बाजूला हलविण्याचा निर्णय नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी जाहीर केला आहे. मात्र, बाजारपेठेपासून काहीसे दूर असलेल्या या मैदानात ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची खरेदीसाठी कितपत सोय होणार, असा प्रश्न व्यापारी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहतूक कोंडीमुक्त बाजारपेठेसाठी अतिक्रमण हटविण्याची कारवाई आवश्यक असली, तरी सणासुदीच्या काळात विक्रेते आणि ग्राहकांची गैरसोय होणार नाही, यासाठी पर्यायी व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.




