मुंबई गोवा महामार्गावरील अंजनारी पुलाजवळ कंटेनरचा भीषण अपघात; पोलीस वाहन नदीच्या उतारावर पलटी


हातखंबा वाहतूक शाखेच्या वाहनाला मागून जोरदार धडक; दोन पोलीस अंमलदारांसह कंटेनर चालक गंभीर जखमी


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव कंटेनरने हातखंबा वाहतूक शाखेच्या (टॅप) शासकीय वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पोलीस वाहन महामार्गावरून थेट नदीच्या दिशेने खोल उतारावर जाऊन उलटले. तर कंटेनरही रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी आणि कंटेनर चालक गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हातखंबा वाहतूक शाखेचे शासकीय वाहन (क्र. MH 08 BE 3561) अंजनारी पुलाजवळील उतारावरून जात होते. याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरने (क्र. RJ 09 GE 2397) पोलीस वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की, पोलीस वाहन रस्त्यावरून घसरत खोल उतारावर जाऊन पलटी झाले.

या दुर्घटनेत पोलीस अंमलदार शिंगाडे आणि सहाय्यक पोलीस फौजदार संतोष गायकवाड गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली. दोघांनाही पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलीस वाहनाला धडक दिल्यानंतर कंटेनरही महामार्गाच्या बाजूला उलटला. या अपघातात कंटेनर चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. त्याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सानप यांच्यासह लांजा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासह मदतकार्य आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button