
देशाविरोधात कटकारस्थान; पंतप्रधानांचा आरोप; अफवा पसरवून अस्थिरतेचा प्रयत्न!
एकता नगर, पीटीआय : सध्याच्या जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात देशाविरोधात कटकारस्थाने करणार्या शक्ती सक्रिय झाल्या आहेत. विरोधी पक्ष हे विरोधी नव्हे, तर ‘अवरोधी पक्ष’ झाले आहेत. ते देशाच्या विकासात अडथळे निर्माण करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केली.
देश परकीय आव्हानांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना काही जण अफवा पसरवून अस्थिरता निर्माण करत आहेत, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी ‘दिमागी नक्षलीं’पासून सावध राहण्याचे आवाहन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौर्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी, ”गेल्या दशकाहून अधिक काळातील नैराश्यामुळे, हे लोक आता उघडपणे समोर आले आहेत. परदेशात कोण कोणाला गुपचूप भेटत आहे? भारतविरोधी शक्ती कोणाला पाठिंबा देत आहेत? देशाच्या शत्रूंची भाषा कोण बोलत आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. देशविरोधी शक्ती सक्रिय झाल्याचे सांगत, आपल्याला हे सर्व ओळखावे लागेल, असे ते म्हणाले.
परकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रयत्न करत असताना देशातील काही शक्ती कारस्थाने करत आहेत. विरोधक घटनात्मक मूल्यांना हरताळ फासत आहेत, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली. देशातून नक्षलवाद संपला असला असला तरी, दिमागी नक्षलवाद्यांचा धोका अद्याप संपलेला नाही, असे मोदींनी सांगितले. पूर्वीच्या सरकारांनी गरीबी हटावच्या केवळ घोषणा केल्या मात्र प्रत्यक्ष काहीच केले नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत ५० कोटी नागरिक दारिद्र्यरेषेवर आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
देशाची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न
समाजमाध्यमाचा हत्यार म्हणून वापर करून अफवा पसरवल्या जात आहेत. त्या आधारे देशाती प्रतीमा मलिन करण्याचा प्रयत्न असून, देशवासियांनी एकजुटीने हा प्रयत्न हाणून पाडावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.




