
सौंदळ येथे अर्जुना नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे; ओळख पटविण्याचे राजापूर पोलिसांसमोर आव्हान
राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील अर्जुना नदीपात्रात एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौंदळ येथील कोंड परिसरात राजू सातकुट यांच्या आंब्याच्या बागेजवळून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बाब निदर्शनास येताच स्थानिक पोलीस पाटील समृद्धी सिद्धांत पाटील (वय ३२, रा. पाटीलवाडी, सौंदळ) यांनी याबाबत राजापूर पोलिसांना माहिती दिली.
मृत व्यक्तीच्या अंगात चॉकलेटी रंगाची हाफ पँट होती. नदीच्या पाण्यात बराच काळ राहिल्यामुळे मृतदेह फुगून त्याचा चेहरा व शरीर पांढरट-लालसर झाले होते. तसेच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. संबंधित व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार गुरुप्रसाद महाडीक यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अपमृत्यू क्रमांक ६९/२०२६ अशी नोंद केली आहे.
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.




