निरोगी रत्नागिरीसाठी १०० दिवसांची महामोहीम: ‘३० वर्षाचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’



बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि आहारातील अनियमितता यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे असंसर्गजन्य आजार (NCD) आज घराघरांमध्ये पोहोचले आहेत. या आजारांचे सर्वात मोठे संकट म्हणजे सुरुवातीच्या काळात यांची कोणतीही ठळक लक्षणे जाणवत नाहीत. “मला कसलाही त्रास नाही, म्हणजे मी अगदी ठणठणीत आहे” हा गैरसमज अनेकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो. हाच धोका वेळीच ओळखून रत्नागिरी जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत ‘३० वर्षाचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसांचे धडक अभियान सुरू करण्यात आले आहे.
१ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश ३० वर्षे व त्यापुढील नागरिकांमधील आजारांचे वेळेत निदान करून त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा आहे.
अभियानात मिळणाऱ्या मोफत तपासण्या

  • रक्तदाब व मधुमेह तपासणी: उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे अचूक प्रमाण तपासणे.
  • शारीरिक तंदुरुस्ती मोजमाप: वजन, उंची आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) द्वारे लठ्ठपणा व आरोग्याची स्थिती तपासणे.
  • कर्करोग पूर्वतपासणी: गृहभेटींच्या माध्यमातून तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी.
  • तातडीने पुढील उपचार: तपासणीदरम्यान आजाराची शंका आल्यास संबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी थेट मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये त्वरित संदर्भित (Refer) करण्याची सोय.
    तपासणी कुठे आणि कशी कराल?
    जिल्ह्यातील सर्व आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात या सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी घरोघरी जाऊन याविषयी जनजागृती करत असून नागरिकांना तपासणीसाठी प्रवृत्त करत आहेत.
    आजची तपासणी, उद्याचे निरोगी आयुष्य
    “वेळेत निदान हाच उत्तम उपचाराचा पाया आहे,” हा संदेश देत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी जिल्ह्यातील ३० वर्षे किंवा त्यावरील सर्व नागरिकांना नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. स्वतःचे आरोग्य जपणे ही केवळ स्वतःची नव्हे तर कुटुंबाची गरज आहे; म्हणूनच प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन ‘निरोगी रत्नागिरी’ घडवण्यात सक्रिय योगदान द्यावे.
    – अमृता धुंदूर-भातडे
    जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button