
कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन गोवंशांसह बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.५५ वाजण्याच्या सुमारास शिरगावहून अलोरेकडे जाणार्या मार्गावर, कुंभार्ली गावाच्या अलीकडे असलेल्या नदीच्या पुलावर घडली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहनाची तपासणी केली असता, बोलेरो पिकअप (क्र. एमएच ५० एन ५४७८) मधील मागील बाजूच्या हौद्यात तीन गोवंश दाटीवाटीने आणि आखूड दोरीने बांधून ठेवलेले आढळून आले.या गोवंशांना वेदना व यातना होतील, याची कल्पना असतानाही त्यांची निर्दयपणे वाहतूक करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच ही गुरे कत्तलीसाठी किंवा कत्तलीच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी अजय सुरेश साळुंखे (वय २७), आकाश प्रकाश साळुंखे (वय २९) आणि किरण सुरेश साळुंखे (वय २५) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



