
वैश्य समाजाला दिलासा, हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य हिंदू-वैश्यवाणी एकच जात
राज्यातील ‘हिंदू-वाणी’, ‘हिंदू-वैश्य’ आणि ’हिंदू-वैश्यवाणी’ या तिन्ही नोंदी एकाच ’वैश्यवाणी जातींच्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या तीनही नोंदी इतर मागास प्रवर्गातच मोडत असल्याचे नमूद करत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार संबंधित व्यक्तींना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सक्षम प्राधिकार्यांना आदेश देण्यात आले आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाने मार्च २००८ मध्ये सादर केलेल्या अहवालात ’हिंदू-वाणी’, ’हिंदू-वैश्य’ आणि ’हिंदू-वैश्यवाणी’ या तिन्ही जाती ’वैश्यवाणी’ असल्याचे नमूद केले होते. या नोंदींमध्ये कोणताही फरक करण्याचे कारण नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर एखाद्या व्यक्तीच्या वडिलांच्या, आजोबांच्या किंवा अन्य रक्तनात्यातील व्यक्तीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ’हिंदू-वाणी’, ’हिंदू-वैश्य’ किंवा ‘हिंदू-वैश्यवाणी’ नोंद असल्यास संबंधितांना ’वैश्यवाणी’ जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र द्यावे, असे राज्य मागासवर्ग आयोगाने निर्देश दिले आहेत.




