
‘अमृत’तर्फे ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान राज्यभरात ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’; शिकागो भाषण कृती कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी, दि. ११ ): स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक शिकागो भाषणातील सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि विश्वबंधुत्वाचा विचार समाजात रुजवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान राज्यभरात ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. सन २०२६ पासून दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
आजच्या बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाची मूल्ये केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पंधरवड्याची ठळक वैशिष्ट्ये:
- शिकागो भाषण कृती कार्यक्रम: स्वामी विवेकानंदांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या स्तरावर विविध स्पर्धा, व्याख्याने, परिसंवाद व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
- सहभागासाठी आवाहन: राज्यातील सर्व शाळा, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये आणि खाजगी आस्थापनांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा.
- ऑनलाइन नोंदणी: सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांसाठी https://vbd.mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“विविधतेतून एकता, एकतेतून बंधुता आणि बंधुतेतून सशक्त समाज व समर्थ राष्ट्र” हे ब्रीद समोर ठेवून नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.



