जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणार ७५३ नवीन गुरूजी


जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली असून ’पवित्र पोर्टल’द्वारे तब्बल ७५३ शिक्षकांची महाभरती केली जात आहे. या धडक निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून, शाळांना लवकरच नवीन आणि पात्रताधारक शिक्षक मिळणार आहेत. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष या भरतीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीकडे लागून राहिले आहे.
शिक्षक अभियोग्यता व चाचणी बुद्धिमत्ता (टीएआयटी-२०२५) च्या आधारे प्राधान्यक्रम नोंदणी व लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता निवड प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करणे हा आहे. राज्यातील पवित्र पोर्टलवर स्वयंप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. एकूण रिक्त जागांची संख्या आता ३१ हजार १७१ वर पोहोचली आहे. या रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय प्रक्रियेसाठी १ लाख ५१ हजार २० तर मुलाखतीसह प्रक्रियेसाठी १ लाख ४१ हजार ८६५ प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत. त्यापैकी अनुक्रमे १ लाख ४६ हजार ६५० आणि लाख ३१ हजार ५०५ प्राधान्यक्रम लॉक करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button