राजापूर शहरातील १३ मोकाट गुरांची चिपळूण गोशाळेत रवानगी; नगरपरिषदेची मोहीम सुरूच


राजापूर : शहरातील मोकाट गुरांच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी राजापूर नगरपरिषद प्रशासनाने कठोर कारवाई करत पकडलेल्या १३ मोकाट गुरांची चिपळूण येथील गोशाळेत रवानगी केली आहे. गुरेमालकांनी वारंवार सूचना व आवाहन करूनही गुरे ताब्यात न घेतल्याने नगरपरिषदेला हा निर्णय घ्यावा लागला.
राजापूर शहरातील तसेच परिसरातील गावांतील अनेक गुरे मोकाटपणे बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी फिरत असल्याने व्यापारी, नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः गुरुवारच्या आठवडा बाजारादिवशी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या समस्येचा फटका बसत होता. मोकाट गुरांमुळे शहरात अनेक लहान-मोठे अपघात घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या मंजुरीनंतर मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष धरपकड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १३ मोकाट गुरांची धरपकड करून त्यांना जुने रेस्ट हाऊस परिसरातील कोंडवाड्यात ठेवण्यात आले.
सुमारे २० ते २५ दिवस नगरपरिषदेतर्फे या गुरांना चारा, पाणी व आवश्यक देखभाल पुरविण्यात आली. घंटागाडीद्वारे वारंवार आवाहन करून तसेच सूचना देऊन संबंधित गुरेमालकांना आपली गुरे ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. काही गुरेमालकांनी दंड भरून गुरे ताब्यात घेतली. त्यांना भविष्यात गुरे मोकाट न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मात्र उर्वरित १३ गुरांचे मालक पुढे न आल्याने नगरपरिषद प्रशासनाने सर्व आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. पशुवैद्यकीय तपासणी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या गुरांची चिपळूण येथील गोशाळेत सुरक्षित रवानगी करण्यात आली.
दरम्यान, राजापूर शहरातील मोकाट गुरांविरोधातील धरपकड मोहीम यापुढेही सुरू राहणार असून गुरेमालकांनी आपली गुरे मोकाट सोडल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button