सांगलीत डीजेचा दणदणाट, नऊ मंडळाच्या अध्यक्षांसह चालकांवर गुन्हे, साहित्य जप्त!

सांगली : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजविणाऱ्या आरग (ता. मिरज) येथील नऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह संबंधित साऊंड सिस्टीम चालकांवर मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.

१७ सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. डेसिबल मीटरद्वारे केलेल्या तपासणीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज आढळून आल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी जिल्ह्यातील गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. डीजे सिस्टीम वापरताना एक बेस आणि एक टॉप या मर्यादेचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

मात्र आरग येथील विसर्जन मिरवणुकीत नऊ मंडळांकडून या नियमांना हरताळ फासण्यात आला. संबंधित मंडळांनी चार बेस व दोन टॉप अशा मोठ्या क्षमतेच्या साऊंड सिस्टीमचा वापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाई झालेल्या मंडळांमध्ये बिरदेव तरुण मंडळ, सत्यप्रेमी गणेशोत्सव मंडळ, हिंदवी गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंडळ, नवज्योत गणेशोत्सव मंडळ, वीर गर्जना गणेशोत्सव मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ, एकता गणेशोत्सव मंडळ आणि तरुण मित्र मंडळ यांचा समावेश आहे. या मंडळांच्या अध्यक्षांसह संबंधित साऊंड सिस्टीम चालकांवरही पोलिसांनी कारवाई केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रांत संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पांडुरंग मुंडे, अमित खोत, संभाजी पवार तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली.

गणेशोत्सव हा आनंद, संस्कृती आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, ध्वनीची मर्यादा ओलांडून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे सहन केले जाणार नाही. यापुढेही डेसिबल मीटरद्वारे साऊंड सिस्टीमची तपासणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच साऊंड सिस्टीमचे साहित्य जप्त केले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे या कारवाईने गणेश मंडळे आणि साऊंड सिस्टीम चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button