संगमेश्वर येथे चार एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाचे वेधले लक्ष

बांद्रा-मडगाव, श्री गंगानगर, अजमेर-एर्नाकुलम आणि जबलपूर-कोयंबतूर एक्सप्रेसना थांबा देण्याची मागणी; स्टेशन मास्तरांच्या तक्रार वहीत नोंद

संगमेश्वर : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी स्टेशन मास्तरांकडे असलेल्या तक्रार वहीत या मागणीची नोंद करण्यात आली.

१०११५/१०११६ बांद्रा–मडगाव एक्सप्रेस, १६३११/१६३१२ श्री गंगानगर एक्सप्रेस, १२९७७/१२९७८ अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस या चार साप्ताहिक गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले असून, आता मुंबईसह अन्य शहरांकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर रोड स्थानकावर प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन विविध महत्त्वाच्या गाड्यांना थांबे मिळावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

चारही गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा मिळाल्यास संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, केरळ, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील विविध भागांकडे प्रवासासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी आणि संगमेश्वर रोड स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या चारही साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना लवकरात लवकर थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अनोख्या तक्रारीची रेल्वे स्थानक परिसरात चर्चा रंगली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button