
‘गरब्यासाठी पार्टनर भाड्याने मिळेल’ सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होताच पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल!
Garba partner available for rent : सध्या गणेश उत्सवाचा उत्साह देशभरात दिसतो आहे. तर दुसरीकडे पुढच्या महिन्यात देवीचं नवरात्र येणार आहे. त्यामुळे राज्या-राज्यांमध्ये गरब्याची धूम पाहण्यास मिळणार आहे. अशातच गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी गरबा पार्टनर भाड्याने मिळेल असा संदेश असलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
ज्यानंतर गुजरात पोलिसांचा सायबर सेल विभाग सक्रिय झाला आहे. त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे की अशा कुठल्याही पोस्टवर विश्वास ठेवू नका.
व्हायरल झालेली पोस्ट नेमकी काय?
गुजरातमध्ये नवरात्र धुमधडाक्यात साजरं केलं जातं. तसंच गरब्याचीही धूम पाहण्यास मिळते. याच अनुषंगाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. व्हायरल पोस्टमध्ये तुम्हाला गरब्यासाठीचा पार्टनर भाड्याने मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे. या जाहिरातीत सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे तीन प्रकार आहेत. अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिरातींना भुलू नका असं आवाहन गुजरात पोलिसांच्या सायबर सेल विभागाने केलं आहे. कारण यामागे फ्रॉड असू शकतो, ब्लॅकमेलिंग केलं जाऊ शकतं काहीही प्रकार असू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
व्हायरल जाहिरातीत काय पर्याय देण्यात आले आहेत?
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये ही पोस्ट व्हायरल झाली आहे. गरब्यासाठी पार्टनर भाड्याने घ्या याचाच अर्थ समोरच्या व्यक्तीला मग तो पुरुष असो अथवा स्त्री या दोघांना तुम्हाला तुमचं पार्टनर म्हणून गरब्याला न्यायचं असेल तर त्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. या जाहिरातीत सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे तीन प्रकार आहेत. सिल्वर प्रकार निवडला तर १ हजार रुपये आणि गरबा पार्टनर दोन तासांसाठी अशी अट आहे. गोल्ड प्रकार निवडल्यास १५०० रुपये आणि चार तासांसाठी पार्टनर निवडा असा पर्याय आहे. तर प्लॅटिनम प्रकार निवडल्यास २ हजार रुपये आणि रात्रभरासाठी पार्टनर तुमचा असा पर्याय या व्हायरल जाहिरातीत देण्यात आला आहे. या पोस्टमध्ये तरूणांना आणि तरूणींना आकर्षित करण्यासाठी मॅचिंग कपडे, सेल्फी, कन्सेप्ट तयार करून तसं ड्रेसिंग करणं यावरही भर देण्यात आला आहे.
पोलिसांनी या व्हायरल पोस्ट बाबत काय म्हटलंय?
अहमदाबाद पोलीस खात्यातील सायबर सेलचे सहाय्यक पोलीस अधीक्षक हार्दिक मंडाकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील सहा ते सात दिवसांपासून आम्ही अशा पोस्टवर लक्ष ठेवून आहोत. काही प्रोफाईल्सवर या पोस्ट आल्या होत्या. काही प्रोफाईलचा आम्ही शोध घेतला आहे. त्या बनावट नसून खऱ्या असल्याचं आम्हाला कळलं आहे. काही युजर्सनी त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा प्रकार केल्याचं कळतं आहे. या प्रकरणात आम्ही पुढील माहिती घेत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही लोकांना हे आवाहन करू इच्छितो की कुणीही अशा प्रकारांना भुलून पैसे ट्रान्सफर करू नयेत.




