
३,३८३ कोटींचा मालक बनला भिकारी; स्वतःच्याच ऑफिसच्या वॉचमनने हाकलले!
भिकाऱ्याच्या वेशात साडेतीन तास रस्त्यावर फिरले भाजप आमदार पराग शाह; गुरूंच्या शिकवणीतून घेतला अनोखा अनुभव
मुंबई : हातात झाडू, दुसऱ्या हातात प्लास्टिकची पिशवी, अंगावर मळके कपडे आणि चेहऱ्यावर वेषांतराचा मेकअप… मुंबईतील घाटकोपरच्या रस्त्यांवर काही तास एक भिकारी फिरत होता. कोणी त्याला हटकले, कोणी झिडकारले, तर काहींनी दोन घास खायला दिले आणि काहींनी हातावर पैसेही ठेवले. मात्र, हा सामान्य भिकारी नव्हता. तब्बल ३,३८३ कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक आणि घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह होते.
जैन धर्मातील पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर धर्मगुरू राष्ट्रसंत नम्रमुनि महाराज साहेब यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत पराग शाह यांनी एका दिवसासाठी भिकाऱ्याचे जीवन अनुभवण्याचा अनोखा निर्णय घेतला.
पद, पैसा आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून उतरले रस्त्यावर
‘तुम्ही जिथे जाता, तिथे लोक तुम्हाला तुमच्या पद आणि वैभवामुळे ओळखतात. पण हे पद आणि वैभव निघून गेले, तर स्वतःच्या इमारतीचा सुरक्षा रक्षकही तुम्हाला आत जाऊ देणार नाही,’ असा विचार राष्ट्रसंत नम्रमुनि महाराज साहेब यांनी मांडला होता.
या विचाराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी पराग शाह यांनी आपली ओळख, पद आणि संपत्ती पूर्णपणे बाजूला ठेवत वेषांतर केले. त्यानंतर घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरासह विविध भागांत ते सुमारे साडेतीन तास भिकाऱ्याच्या वेशात फिरले.
सर्वात धक्कादायक अनुभव… स्वतःच्याच वॉचमनने बाहेर काढले!
या प्रयोगादरम्यान पराग शाह यांना स्वतःच्याच ओळखीच्या ठिकाणी अनोखा अनुभव आला. ते वेषांतर करून मित्रांच्या कार्यालयात गेले; मात्र त्यांना प्रवेश मिळाला नाही.
विशेष म्हणजे, स्वतःच्या कार्यालयातही त्यांना सुरक्षा रक्षकाने ओळखले नाही आणि बाहेर जाण्यास सांगितले. कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेली व्यक्ती समोर उभी आहे, याची कोणालाही कल्पना नव्हती.
नंतर पराग शाह पुन्हा साध्या वेशात त्याच परिसरात गेले आणि भिकाऱ्याच्या वेशात असताना ज्यांनी त्यांना मदत केली होती, अशा काही लोकांशी संवाद साधला.
‘हा राजकीय स्टंट नाही’
या अनोख्या प्रयोगाबद्दल बोलताना पराग शाह यांनी हा कोणताही राजकीय स्टंट किंवा प्रचाराचा भाग नसल्याचे स्पष्ट केले.
त्यांच्या मते, रोजच्या आयुष्यात लोक पद आणि प्रतिष्ठेमुळे आपल्याशी जोडले जातात. मात्र, पद आणि संपत्ती गेल्यानंतर आपल्यासोबत कोण उभे राहते, हेच खरे नाते आणि माणुसकीची कसोटी असते.
या अनुभवातून आपल्याला मोठा धडा मिळाल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘जोपर्यंत पद आणि श्रीमंती आहे, तोपर्यंतच लोक सोबत असतात; ज्या दिवशी हे वैभव निघून जाईल, त्या दिवशी वास्तव समोर येते.’
३,३८३ कोटींच्या संपत्तीपासून भिकाऱ्याच्या भूमिकेपर्यंत!
कोट्यवधींची संपत्ती, आमदारकीचे पद आणि समाजातील मोठी ओळख असतानाही एका दिवसासाठी सर्व काही बाजूला ठेवून रस्त्यावर भिकाऱ्याचे जीवन जगण्याचा पराग शाह यांचा हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पद आणि पैसा माणसाला मिळणारा मान ठरवतात की माणुसकी? हा प्रश्नही त्यांच्या या अनुभवातून समोर आला आहे




