
वडिलांना खोलीत डांबून लाथाबुक्क्यांनी मारहाण
दारू पिण्याच्या सवयीवरून वाद; दोन मुलांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
दापोली : दारू पिण्याच्या सवयीवरून झालेल्या वादातून वडिलांना खोलीत डांबून शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी दोन मुलांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश संभाजी पालशेतकर (६२, रा. भोपण विठ्ठलवाडी, ता. दापोली) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांचे मुलगे विशाल पालशेतकर आणि नीलेश पालशेतकर यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिस डायरीत विशाल पालशेतकर हे पोलिस पाटील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरेश पालशेतकर हे त्यांच्या खोलीत झोपले होते. त्यावेळी शेजारील ठिकाणी स्पीकरवर मोठ्या आवाजात संगीत सुरू होते. आवाज कमी करण्यास सांगितल्याने त्यावरून वाद झाला. त्यानंतर दोन्ही मुलांनी त्यांच्या खोलीत येऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.
तसेच, खोलीचा दरवाजा बंद करून सुरेश पालशेतकर यांना आत डांबून हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत दुखापत झाल्यानंतर त्यांनी १५ सप्टेंबर रोजी दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले.
या तक्रारीच्या आधारे दाभोळ सागरी पोलिसांनी विशाल पालशेतकर आणि नीलेश पालशेतकर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.




