
नाशिकपेक्षा अधिक खड्डे पाडण्यासाठीच गोगावलेंना मंत्रीपद?” भास्कर जाधवांचा महायुतीवर हल्लाबोल
महायुती सरकारच्या पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर राजकीय आखाड्यात आता थेट ठिणग्या पडू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारच्या पालकमंत्री निवडीची अक्षरशः लक्तरे काढली आहेत. गुहागरच्या पालपेणे गावातून भास्कर जाधवांनी थेट गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. कुंभमेळ्यातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची आठवण करून देत, गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्री पद म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमोशन असल्याचा थेट आरोप जाधवांनी केलाय. एवढंच नाही तर नाशिक खड्ड्यात घालणाऱ्या महाजनांनंतर, आता मुंबई महामार्गाची वाट लावण्यासाठी भरत गोगावलेंना आणलंय का? नाशिकपेक्षा जास्त खड्डे पाडण्यासाठी गोगावलेंची नियुक्ती झालीये का? असा सणसणीत टोला जाधवांनी लगावला आहे.




