
मुचरीचा वाघ हरपला; ज्येष्ठ कलावंत पांडुरंग बाळ गराटे (बुवा ) यांचे निधन
मुचरी गावचे ज्येष्ठ कलाकार, केदारलिंग नमन मंडळाचे लोकप्रिय कलावंत आणि ‘वाघ’ या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले पांडुरंग बाळ गराटे (बुवा) यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. जवळ जवळ ६० ते६५ वर्ष नमन कलावंत म्हणून अविरत सेवा त्यांच्या निधनाने मुचरी गावच्या सांस्कृतिक आणि नमन कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पांडुरंग बाळ गराटे यांनी मुचरी गावच्या केदारलिंग नमन मंडळात वर्षानुवर्षे ‘वाघ’ाची भूमिका समर्थपणे साकारली. आपल्या प्रभावी अभिनयाने, आवेशपूर्ण सादरीकरणाने आणि कलाप्रेमाने त्यांनी असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आई निनावी आणि आई वाघजाईची सेवा करत त्यांनी मुचरीच्या पारंपरिक लोककलेच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले.
कोकणच्या लोककलेची समृद्ध परंपरा असलेल्या नमन कलेमध्ये बुवांचे योगदान विशेष उल्लेखनीय होते. रंगमंचावर त्यांची ऊर्जा, अभिनयातील सहजता आणि ‘वाघ’ाच्या भूमिकेतील आवेश यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या निधनाने नमन कला क्षेत्राचे तसेच मुचरी गावच्या सांस्कृतिक विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
बुवांचे संपूर्ण आयुष्य साधेपणाने गेले. मुचरी गावात मोलमजुरी करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आपल्या पाचही मुलांना—दोन मुलगे अनिल व सुरेश आणि तीन मुली सुवर्णा, वासंती व अर्चना—यांना मोठे करून त्यांचे संसार उभे केले. कष्ट, प्रामाणिकपणा आणि कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी यांचा आदर्श त्यांनी आपल्या आयुष्यात जपला.
आज मुचरीच्या नमन मंडळातील वाघ हरपला…
मुचरी गावचा एक ज्येष्ठ कलावंत हरपला…
एक जिवाभावाचा माणूस हरपला…
पांडुरंग बाळ गराटे बुवा यांच्या आठवणी आणि त्यांनी मुचरीच्या लोककलेसाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.




