
उत्कृष्ट निर्यातदारांसाठी ‘राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार’; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. १० ): महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुक्तालयामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना देण्यात येणाऱ्या सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांच्या ‘राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारां’साठी विविध प्रवर्गातील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी पात्र असलेल्या निर्यातदारांनी आपले अर्ज ३१ ऑगस्टपूर्वी विहित नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.
या राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारांतर्गत विविध प्रवर्गांमध्ये एकूण ३४ सुवर्ण व ३२ रजत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
प्रथम पुरस्कार (सुवर्ण): रु. ५१ हजार/- रोख व प्रशस्तीपत्र
द्वितीय पुरस्कार (रजत): रु. २५ हजार/- रोख व प्रशस्तीपत्र
या पुरस्कारासाठी निर्याताभिमुख सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), व्यापारी निर्यातदार (Merchant Exporters), ट्रेडिंग हाऊस, एक्सपोर्ट हाऊस, सेवा निर्यातदार, महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उत्पादक निर्यातदार तसेच अभियांत्रिकी व्यतिरिक्त (Non-Engineering) ODOP GI निर्यातदार अर्ज करू शकतात.
रत्न व दागिने, इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत उत्पादने, अभियांत्रिकी व वाहन उद्योग, रसायने व संलग्न उत्पादने, औषधनिर्मिती व सौंदर्यप्रसाधने, प्लास्टिक उत्पादने, लोखंड व पोलाद, वस्त्रोद्योग व चामड्याशी संबंधित उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योग, मत्स्य व सागरी उत्पादने, IT व ITES, पर्यटन, आदरातिथ्य व वेलनेस, शैक्षणिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, बांधकाम, फिनटेक, BFSI आणि मीडिया व मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील निर्यातदारांना हा पुरस्कार लागू आहे.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) घटकांसाठी परकीय चलनाच्या बाबतीत निर्यातीचे एकूण FOB (Free on Board) मूल्य किमान रु. २ कोटी असणे आवश्यक आहे.
निर्यातीचे उत्पादनाशी असलेले गुणोत्तर आणि निर्यातीतील सातत्यपूर्ण वाढ.
नवीन बाजारपेठांचा विकास आणि नवीन उत्पादनांची निर्यात.
आव्हानात्मक परदेशी बाजारपेठेत मिळवलेला यशस्वी प्रवेश.
हरित उपक्रमांचा (Green Initiatives) अवलंब.
पात्र निर्यातदारांनी आपल्या प्रवर्गानुसार आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज ३१ ऑगस्टपूर्वी diexport@maharashtra.gov.in आणि didic.ratnagiri@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवावेत.
विहित नमुन्यातील अर्ज आणि अधिक माहितीसाठी संबंधितांनी ‘जिल्हा उद्योग केंद्र’ कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



