उत्कृष्ट निर्यातदारांसाठी ‘राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार’; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन


​रत्नागिरी, दि. १० ): महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुक्तालयामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना देण्यात येणाऱ्या सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांच्या ‘राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारां’साठी विविध प्रवर्गातील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी पात्र असलेल्या निर्यातदारांनी आपले अर्ज ३१ ऑगस्टपूर्वी विहित नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.
या राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारांतर्गत विविध प्रवर्गांमध्ये एकूण ३४ सुवर्ण व ३२ रजत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
​प्रथम पुरस्कार (सुवर्ण): रु. ५१ हजार/- रोख व प्रशस्तीपत्र
​द्वितीय पुरस्कार (रजत): रु. २५ हजार/- रोख व प्रशस्तीपत्र
या पुरस्कारासाठी निर्याताभिमुख सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), व्यापारी निर्यातदार (Merchant Exporters), ट्रेडिंग हाऊस, एक्सपोर्ट हाऊस, सेवा निर्यातदार, महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उत्पादक निर्यातदार तसेच अभियांत्रिकी व्यतिरिक्त (Non-Engineering) ODOP GI निर्यातदार अर्ज करू शकतात.
रत्न व दागिने, इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत उत्पादने, अभियांत्रिकी व वाहन उद्योग, रसायने व संलग्न उत्पादने, औषधनिर्मिती व सौंदर्यप्रसाधने, प्लास्टिक उत्पादने, लोखंड व पोलाद, वस्त्रोद्योग व चामड्याशी संबंधित उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योग, मत्स्य व सागरी उत्पादने, IT व ITES, पर्यटन, आदरातिथ्य व वेलनेस, शैक्षणिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, बांधकाम, फिनटेक, BFSI आणि मीडिया व मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील निर्यातदारांना हा पुरस्कार लागू आहे.
​सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) घटकांसाठी परकीय चलनाच्या बाबतीत निर्यातीचे एकूण FOB (Free on Board) मूल्य किमान रु. २ कोटी असणे आवश्यक आहे.
​निर्यातीचे उत्पादनाशी असलेले गुणोत्तर आणि निर्यातीतील सातत्यपूर्ण वाढ.
​नवीन बाजारपेठांचा विकास आणि नवीन उत्पादनांची निर्यात.
​आव्हानात्मक परदेशी बाजारपेठेत मिळवलेला यशस्वी प्रवेश.
​हरित उपक्रमांचा (Green Initiatives) अवलंब.
पात्र निर्यातदारांनी आपल्या प्रवर्गानुसार आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज ३१ ऑगस्टपूर्वी diexport@maharashtra.gov.in आणि didic.ratnagiri@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवावेत.
​विहित नमुन्यातील अर्ज आणि अधिक माहितीसाठी संबंधितांनी ‘जिल्हा उद्योग केंद्र’ कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button