
परशुराम घाटात पुन्हा भूस्खलनाची भीती; डोंगरातून झरे वाहू लागल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकदा भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. धामणदेवीजवळ महामार्ग पोलिस चौकीसमोरील डोंगरातून मातीखालून पाण्याचे झरे वाहू लागल्याने संभाव्य भूस्खलनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात डोंगरावरील दगड व माती महामार्गावर कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी वळविण्यात आली होती. मात्र, या घटनेनंतरही डोंगराला संरक्षक जाळी, रिटेनिंग वॉल किंवा इतर कायमस्वरूपी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती सैल होत असून पाण्याचे झरे वाहू लागल्याने मोठ्या भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्याचा बराच कालावधी अद्याप शिल्लक असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने संबंधित ठिकाणाची पाहणी करून संरक्षक उपाययोजना राबवाव्यात, तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.




